घाटंजी | प्रतिनिधी
घाटंजी येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण मा. आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे परिसरातील पशुधनाच्या विविध आजारांचे निदान अधिक अचूक, जलद व प्रभावीपणे करता येणार असून शेतकरी व पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून जनावरांमधील विविध आजार, गर्भधारणा तसेच अंतर्गत आरोग्यविषयक समस्यांचे वेळेत निदान होणार असल्याने उपचार प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल. त्यामुळे पशुधनाचे आरोग्य सुधारण्याबरोबरच पशुपालकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासही मदत होणार आहे.
यावेळी आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी शेतकरी व पशुपालकांच्या हितासाठी आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी अशा सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

