गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो – प्राचार्या मंजुषा सु. देशमुख

 



प्रतिनिधी | रिसोड

रिसोड तालुक्यातील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञतेची अनोखी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थिनी सोफिया शेख हिने स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी नखवाल मॅडम यांनी केले.

यावेळी विद्यार्थिनी स्नेहल बाजड, रूपाली मोरे, नंदनी नेव्हल, ईश्वरी खोडे, ईश्वरी भोपाळे, प्राजक्ता भोसले, आशीफा शेख, ज्ञानेश्वरी काळे, वैष्णवी सरदार, आरती बिल्लारी व शितल पवार यांनी गुरूविषयी मनोगत व्यक्त केले. समृद्धी गव्हाणे, अंकिता डव्हळे व आरती गायकवाड यांनी सुमधुर गीत सादर केले, तर विद्यार्थिनींच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

मार्गदर्शन करताना प्रा. अभिषेक टिकाईत यांनी विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्रा. साधना बोरकर यांनी गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. भाग्यश्री बेळकुंडे व रजनी नखवाल यांनी गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

प्रमुख अतिथी पर्यवेक्षक सुनील डहाळके यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. समारोपात प्राचार्या मंजुषा सु. देशमुख यांनी "गुरु हा विद्यार्थ्याच्या जीवनाचा शिल्पकार असून तोच विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देतो. जन्मदात्याइतकाच मार्गदाताही श्रेष्ठ असतो," असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कु. तृप्ती सदार हिने केले, तर खुशी खडसे हिने आभार मानले. प्रत्येक शिक्षकाचा पुष्पगुच्छ, पेन, शुभेच्छापत्र व औक्षण करून विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त केली. शेवटी सर्व विद्यार्थिनींना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


#गुरुपौर्णिमा #रिसोड #भारतमाध्यमिककन्याशाळा #शिक्षण #विद्यार्थिनी #गावाकडचीबातमी

Post a Comment

Previous Post Next Post