जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक सभा शनिवारी गुरुदेव सेवाश्रम, राधा नगर येथे उत्साहपूर्ण व विचारमंथनात्मक वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाउपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ होते. मार्गदर्शक म्हणून राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, प्रमुख अतिथी म्हणून रामदास सदार (कोषाध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ) तसेच ज्येष्ठ सदस्य लक्ष्मण तडस उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीतील निर्णय, अहवाल व आगामी दिशा यांचे सविस्तर वाचन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा व शहर शाखेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीत जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाशी समन्वय वाढविणे, अंधश्रद्धाविरोधी मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबविणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे आणि जनजागृती उपक्रम गावागावात पोहोचविणे याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली. तसेच नवीन शाखा बांधणी, संघटन विस्तार, बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद, लेखन-वाचन कार्यशाळा आणि विविध जनजागृती उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.
यावेळी अमरावती जिल्हा शाखेला प्राप्त झालेल्या "लक्ष्यवेधी शाखा पुरस्कार" निमित्त जिल्हाउपाध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांचा सत्कार करण्यात आला. राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या हस्ते हा पुरस्कार शाखेला प्रदान करण्यात आला. तसेच "लक्ष्यवेधी कार्यकर्ता पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल जिल्हाकार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांचाही जिल्हा व शहर शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला. सभेत उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना प्रेरणादायी पुस्तके भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वक्त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी व अवैज्ञानिक प्रथांविरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावपातळीपर्यंत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. "वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि मानवता" या मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीसाठी संघटित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
सभेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विविध उपक्रम विभागाचे जिल्हा कार्यवाह आशिष देशमुख यांनी विशेष संपर्क व समन्वय साधला. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन सचिन खोब्रागडे यांनी केले, तर मंजू वासनिक यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गीत सादर करून सभेची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी अफसरभाई (जिल्हाकार्यवाह, बुवाबाजी संघर्ष विभाग), महेश देशमुख, प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सचिन खोब्रागडे, मंजू वासनिक, दिलीप लाडे, सौरभ देशमुख यांच्यासह जिल्हा व शहर शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा" आणि "वैज्ञानिक दृष्टिकोन – मानवतेचा पाया" या घोषणांनी सभेचा उत्साहपूर्ण समारोप झाला.

