महाराष्ट्र
वर्धा,हिंगणघाट प्रतिनिधी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील वीज व्यवस्थेची सज्जता, विविध विकासकामांचा आढावा आणि नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) च्या अभियंते, उपअभियंते व सहाय्यक अभियंत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.
बैठकीत शहरी व ग्रामीण भागातील वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन उपकेंद्रांची उभारणी, वाढत्या वीज मागणीनुसार ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ, देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य तांत्रिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळून वीजवाहिन्या व विद्युत खांबांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन, अशा प्रसंगी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साहित्य व यंत्रणा सदैव सज्ज ठेवण्याच्या सूचना आमदार समीर कुणावार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. संवेदनशील भागांची पूर्वतयारी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावरही त्यांनी भर दिला.
नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वीज समस्यांचा सामना करावा लागू नये, तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे आणि वीज विभागाची यंत्रणा अधिक जबाबदारीने कार्यरत राहावी, यासाठी स्पष्ट निर्देश देत जनहिताच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीच्या शेवटी पावसाळ्यात वीज यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच लोकाभिमुख, तत्पर आणि परिणामकारक सेवा देण्यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही आमदार कुणावार यांनी केले.
जनहिताला केंद्रस्थानी ठेवून मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या बैठकीस हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व अभियंते, उपअभियंते आणि सहाय्यक अभियंते उपस्थित होते.

