यवतमाळ,पुसद : धूरमुक्त अभियानांतर्गत 2016 मध्ये केरोसीन वितरण बंद करून परवानाधारकांना बेरोजगार केले आणि आता ग्राहक नसताना पुन्हा केरोसीन उचलण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत पुसद तालुक्यातील केरोसीन परवानाधारकांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पुसद येथे झालेल्या बैठकीत विविध मागण्या मांडत 23 जून रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
दि. 6 जून रोजी शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या सभागृहात केरोसीन परवानाधारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शासनाने मे 2026 मध्ये जागतिक आणीबाणीचे कारण देत केरोसीन वितरण पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
परवानाधारकांनी शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या असून केरोसीन विक्रीवरील केवळ 2 रुपये प्रतिलिटर कमिशनऐवजी प्रत्येक परवानाधारकाला दरमहा 20 हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच ग्राहकांची मागणी नसल्यामुळे 68 रुपये प्रतिलिटर दराने केरोसीनचे चलन भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने हे चलन शासनाने स्वतः भरावे, अशीही मागणी करण्यात आली.
बैठकीत वक्त्यांनी ग्रामीण भागातील बदललेल्या परिस्थितीकडे लक्ष वेधले. आज बहुसंख्य घरांमध्ये गॅस सिलेंडर, सौरऊर्जा यंत्रणा व आधुनिक साधनांचा वापर होत असून केरोसीन स्टोव्ह व दिव्यांचा वापर जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे केरोसीनला ग्राहकच उरले नसल्याचा दावा करण्यात आला.
दैनिक ‘महा परिवर्तन’चे संपादक व संयुक्त पत्रकार संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी यावेळी परवानाधारकांच्या व्यथा मांडताना सांगितले की, 2016 मध्ये केरोसीन व्यवसाय बंद झाल्यानंतर अनेकांना पर्यायी रोजगार शोधावा लागला. आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेताना शासनाने परवानाधारकांना विश्वासात घेतले नसून ग्राहक नसताना केरोसीन उचलण्याची सक्ती अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले.
बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा देखील जाहीर करण्यात आली. 8 जून रोजी पुसद तहसीलदार व यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून 15 जून रोजी यवतमाळ येथे जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील परवानाधारकांची जिल्हास्तरीय बैठक होणार आहे. त्यानंतरही मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास 23 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
बैठकीला रामदास कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ललिता सुनील जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सना खान यांनी केले. यावेळी हिरालाल राठोड, प्रेमिला राठोड, लता विठ्ठल भोयर, इनोस इब्राहिम, शफी चव्हाण, सना उल्ला खान, अभिषेक बावणे, शेख इब्राहिम, बबीता राठोड, बबन राठोड यांच्यासह तालुक्यातील अनेक केरोसीन परवानाधारक उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी, "मानधनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आणि शासनाने चलन भरण्याची जबाबदारी स्वीकारेपर्यंत केरोसीन उचलणार नाही," असा एकमुखी निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आंदोलनाचे नेतृत्व रामदास कांबळे करणार असून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.



