प्रतिनिधी | पत्रकारांबाबत शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमने तीव्र भूमिका घेतली असून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन, प्रशासन आणि जनतेमधील संवादाचा महत्त्वाचा दुवा आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अपमानास्पद भाषा वापरणे ही संपूर्ण पत्रकारितेचा अवमान करणारी बाब असून अशा प्रकारामुळे मुक्त व निर्भीड पत्रकारितेवर दबाव निर्माण होतो.
व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमने शासनाकडे संबंधित वक्तव्याची गंभीर दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच खासदार संजय दिना पाटील यांनी संपूर्ण पत्रकार बांधवांची जाहीर व लेखी बिनशर्त माफी मागावी, त्यांच्या वर्तनाची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी आणि भविष्यात पत्रकारांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर धोरण जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, राज्यातील पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी प्रभावी पत्रकार संरक्षण उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत खासदार संजय दिना पाटील तसेच शिंदे गटाच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला आहे.
व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमने इशारा दिला आहे की, शासनाने या प्रकरणात तातडीने योग्य कारवाई न केल्यास राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. पत्रकारांचा सन्मान हा लोकशाहीचा सन्मान असून पत्रकारांवरील कोणत्याही प्रकारचे शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक हल्ले सहन केले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.

