आमदार भीमराव केराम यांनी उद्घाटन केलेल्या प्रवेशद्वार कमानीवरून वाद; चौघांचे माहूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

 

माहूर

Maharashtra India Gavakadachibatmi



श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यातील मौजे लिंबायत येथील मालवाडा हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 161A लगत उभारण्यात आलेल्या 'वीर शिरोमणी महाराणा प्रताप प्रवेशद्वार' या कमानीवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रवेशद्वाराचे लोकार्पण दोन दिवसांपूर्वी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले होते.

दरम्यान, संबंधित प्रवेशद्वार अधिकृत परवानगी घेऊन उभारण्यात आले आहे का, याची चौकशी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच, प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे समाविष्ट करून नूतनीकरण करण्यात यावे किंवा 'ग्रामपंचायत लिंबायत प्रवेशद्वार' असे नामकरण करण्यात यावे, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे.

आंदोलकांचे म्हणणे आहे की, जर संबंधित प्रवेशद्वार अनधिकृतरीत्या उभारण्यात आले असेल, तर शासनाने त्याबाबत योग्य चौकशी करून आवश्यक ती कारवाई करत जागा मोकळी करावी.

या मागण्यांसाठी प्रविण भिमराव बरडे, विजय सुदाम जाधव, राहुल बेंगाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ ऑगस्टपासून माहूर तहसील कार्यालयासमोर भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहे.

या प्रकरणात तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित प्रशासन काय भूमिका घेते आणि प्रवेशद्वाराच्या वैधतेबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




टीप : प्रवेशद्वार अनधिकृत असल्याचा दावा आंदोलकांनी केला असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका किंवा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही.


Post a Comment

Previous Post Next Post