जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
हिरपूर : विकासाच्या आणि स्मार्ट युगाच्या घोषणा होत असताना हिरपूर गावातील मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्यावर सर्वत्र खड्डे आणि चिखल असल्यामुळे पादचारी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने व तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गावाच्या विकासासाठी रस्त्यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक असताना संबंधित विभागाचे होत असलेले दुर्लक्ष ग्रामस्थांच्या संतापाचे कारण ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी हिरपूरवासीयांनी केली आहे.
