सहाय्यक संपादिका मंगला भोगे
वर्धा: अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने ग्राहकांची MRP (कमाल किरकोळ किंमत) च्या माध्यमातून होत असलेली आर्थिक लूट थांबविण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी वर्धा येथे शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी १० ते ११ या वेळेत महात्मा गांधी पुतळा परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध घोषणाबाजी करून आंदोलन केले.
यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांच्या मार्फत पंतप्रधान, भारत सरकार तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
उत्पादन खर्चावर आधारित वस्तूंची किरकोळ MRP निश्चित करावी.
औषधे, शेतीसाठी लागणारी औषधे, कृषी अवजारे आदींसाठी "एक देश - एक MRP" धोरण लागू करावे.
फसव्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी.
विविध किंमत पद्धतींच्या माध्यमातून ग्राहकांची होत असलेली आर्थिक लूट थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.
यावेळी किशोर मुटे, सतीश देशमुख, विनोद पोटे, विभा देशमुख, कल्याणी मुटे, उत्तम सावरकर, त्र्यंबक पुष्पलवार, जनकजी पालीवाल, भाऊराव कोटकर, प्रफुल्ल क्षीरसागर, नंदू नेरोटे, सुरेश भंडागे, प्रणिता कश्यप आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, याच मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने नवी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावरही आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशभरातील विविध जिल्हा स्तरावर निवेदने देण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

