मराठवाडा संपादक- अनिल बंगाळे
लातूर,प्रतिनिधी : अध्यात्म, योग, समाजप्रबोधन आणि मानवकल्याणाच्या क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून निरपेक्ष भावनेने कार्य करणारे सोनपेठ येथील पूज्य श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांना प्रतिष्ठेचा ‘तपोरत्नम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. काशीचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी तथा डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आदेशानुसार, श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान, जंगमवाडी मठ, वाराणसी यांच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
दि. १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूर येथील वीरतपस्वी मंदिरात जगद्गुरू पंचाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे प्रबंधक राजेंद्रकुमार स्वामी यांनी दिली.
सन २००० मध्ये सोनपेठ मठावर विराजमान झाल्यानंतर श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांनी अध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सन २००२ पासून त्यांनी देशातील बारा ज्योतिर्लिंगांमध्ये श्रावणमास अनुष्ठानांची परंपरा सुरू केली. उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगापासून सुरू झालेला हा आध्यात्मिक प्रवास परळी वैद्यनाथ येथे बाराव्या अनुष्ठानाने पूर्ण झाला. त्यानंतर मराठवाड्यातील विविध गावांमध्ये श्रावणमास अनुष्ठानांच्या माध्यमातून अध्यात्मिक जागृतीचे कार्य सातत्याने सुरू आहे.
महाराजांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वैदिक बालसंस्कार शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण उपक्रम तसेच समाजातील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानांतर्गत १११ मुलींच्या नावे प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या ठेवी जमा करून त्यांनी स्त्रीशिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच वैदिक परंपरा जतन करण्यासाठी आणि भावी पिढीसाठी पुरोहित तयार करण्याच्या उद्देशाने वैदिक प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन केले जाते.
गेल्या पंचवीस वर्षांत अनेक अडचणींवर मात करत त्यांनी सोनपेठ मठाचा सर्वांगीण विकास घडवून आणला असून अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचे प्रभावी केंद्र म्हणून मठाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या बहुआयामी, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत त्यांना ‘तपोरत्नम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याने भक्तपरिवार, शिवाचार्य परंपरेतील अनुयायी आणि समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
