गावात गावठी दारू अड्डा आढळल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्यावर कारवाईची शक्यता




 गावात गावठी दारू अड्डा आढळल्यास सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांच्यावर कारवाईची शक्यता


प्रतिनिधी |

गावाच्या हद्दीत गावठी दारू निर्मिती किंवा बेकायदा दारू विक्रीचे अड्डे सुरू राहू नयेत, यासाठी आता सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस पाटील यांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे. संबंधित बाबींची माहिती असूनही ती प्रशासनापासून लपविल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ शकते.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, अशा प्रकारच्या गैरकृत्यांची माहिती दडवून ठेवणाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आदेशानुसार, गावाच्या हद्दीत हातभट्टी किंवा बेकायदा दारू विक्री सुरू असल्याचे आढळूनही स्थानिक पातळीवर त्याबाबतची माहिती लपविली गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबन अथवा शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

तसेच, गावात अवैधरित्या दारू तयार करणारे, कच्चा माल पुरवणारे किंवा त्याची वाहतूक करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास ती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी जमिनीच्या मालकी हक्कासंबंधी किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास स्थानिक प्रशासनाने ती त्वरित उपलब्ध करून द्यावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदींचा हवाला देत अवैधरीत्या दारू तयार करणे, साठवणूक करणे किंवा विक्री करणे हा गंभीर आणि काही प्रकरणांमध्ये अजामीनपात्र गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post