सहकार क्षेत्रात खळबळ; जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांची चौकशी सुरू

 


यवतमाळ | विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे 

Yavatmalnews : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित आर्थिक अनियमितता आणि नियमबाह्य व्यवहारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी नांदगाव खंडेश्वर येथील सहायक निबंधक सचिन पतंगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


प्राप्त माहितीनुसार, बँकेकडे कर्जवाटपाचे ठोस नियोजन नसतानाही वार्षिक ९.५० टक्के व्याजदराने विशेष ठेव योजना राबविण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे १८० कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या. मात्र, या निधीपैकी जवळपास ४० कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये केवळ ७ टक्के व्याजदराने सुरक्षा ठेव स्वरूपात ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या व्यवहारामुळे बँकेला ठेवीदारांना दरवर्षी सुमारे २४ कोटी रुपयांचे व्याज अदा करावे लागणार असून, आर्थिकदृष्ट्या तोट्याचा व्यवहार झाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे बँकेच्या आर्थिक हिताला धक्का बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बँकेच्या ओम कॉलनी शाखेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक प्रवीण दुधे यांनी संचालक मंडळाची पूर्वपरवानगी न घेता सुमारे चार कोटी रुपयांचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने वितरित केल्याचाही आरोप चौकशी आदेशात नमूद करण्यात आला आहे. संबंधित कर्जासाठी पुरेसे तारण घेण्यात आले नसल्याचे तसेच वितरित कर्जाची वसुली अद्याप झालेली नसल्याची बाबही समोर आली आहे.

या सर्व आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी विभागीय सहनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, चौकशीच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post