सामाजिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रात सेवाभाव जपणाऱ्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाला नवी जबाबदारी
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या श्रीमती. रंगुबाई चांगदेव खुडे (ठाकरे) यांच्या बदलीचे आदेश नुकतेच जारी झाले असून, त्यांच्या बदलीची बातमी समोर येताच जलधारा, बेल्लोरी धानोरा, बोधडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
“ठाकरे सिस्टर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती. खुडे यांनी आपल्या सेवाकाळात केवळ शासकीय जबाबदारी पार पाडली नाही, तर सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले. अनेक वर्षे त्यांनी जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात सेवा देताना गरीब, गरजू आणि दुर्गम भागातील रुग्णांना वेळोवेळी मार्गदर्शन, आरोग्यविषयक मदत आणि मानसिक आधार दिला. विशेषतः महिलांमध्ये आरोग्य जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केले. त्यामुळे परिसरातील नागरिक त्यांना केवळ कर्मचारी नव्हे, तर कुटुंबातील सदस्य मानत असल्याची भावना व्यक्त करत आहेत.
श्रीमती. रंगुबाई खुडे या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि धार्मिक परंपरेचा वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तिमत्त्व म्हणूनही संपूर्ण परिसरात परिचित आहेत. जलधारा येथील ह.भ.प. श्री. सत्यनारायण महाराज खुडे यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विचारांचा वारसा त्या पुढे नेत आहेत. गावोगावी धार्मिक कार्यक्रम, समाजप्रबोधन, लोकांशी आत्मीयतेने संवाद आणि सेवाभाव या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे.
त्यांच्या कार्याची विशेष बाब म्हणजे त्यांनी कधीही पदाचा दिखावा न करता सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून काम केले. एखाद्या रुग्णाला उपचारासाठी मदत असो, एखाद्या कुटुंबाला धीर देणे असो किंवा धार्मिक व सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असो — प्रत्येक ठिकाणी त्यांचा सेवाभाव स्पष्टपणे दिसून आला. त्यामुळेच ग्रामीण भागातील अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
त्यांच्या कुटुंबीयांचीही सामाजिक क्षेत्रात मोठी ओळख असून, प्रसिद्ध समाजिक, आरोग्य, राजकीय,वातरोग तज्ञ डॉ. पुंडलिक गोमाजी आमले माळबोरगावकर यांच्या सासू आहेत.तसेच शिक्षण क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रात सेवाभावी काम करणारे शिक्षक प्रसरामजी देशमुख, शिक्षक योगेशजी देशमुख यांच्याही त्या सासूबाई आहेत. समाजहित जपणाऱ्या आणि सेवेला प्राधान्य देणाऱ्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्या संपूर्ण कार्यपद्धतीत दिसून येतो. नागरिकांप्रती असलेली आत्मीयता, संयमी स्वभाव आणि लोकांच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
त्यांच्या बदलीनंतर जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांकडून मिश्र भावना व्यक्त होत आहेत. “लोकांमध्ये मिसळून काम करणारी सेवाभावी व्यक्ती आता दुसरीकडे जाणार” याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पुढील सेवाप्रवासासाठी शुभेच्छा देत, त्यांनी जिथे जाईल तिथेही समाजसेवेचा हाच आदर्श कायम ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
किनवट तालुक्यातील नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहील असे व्यक्तिमत्त्व म्हणून श्रीमती. रंगुबाई चांगदेव खुडे (ठाकरे) यांचे नाव घेतले जात असून, त्यांच्या सेवाभावी कार्याचा ठसा अनेक वर्षे लोकांच्या मनात कायम राहणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
