“सन्मान द्या माणसाला…”
“जगण्याला मरण म्हणालो नाही…
डबक्याला धरण म्हणालो नाही…
इतकेच मी म्हणालो — सन्मान द्या माणसाला…”
या काही ओळी नाहीत, तर समाजातील ढोंगीपणा, अहंकार आणि विषमतेवर मारलेला थेट प्रहार आहेत. कारण आज माणूस जगतोय खरा, पण त्याच्या जगण्याला किंमत उरलेली नाही. सन्मान, समानता आणि माणुसकी या गोष्टी फक्त भाषणात दिसतात; प्रत्यक्षात मात्र माणूस माणसापासून दूर जात आहे.
आज अनेक ठिकाणी काही लोक पद, पैसा, सत्ता किंवा प्रतिष्ठेचा इतका गर्व बाळगतात की त्यांना स्वतःशिवाय दुसरे कोणी मोठे वाटत नाही. “मीच खरा”, “माझेच बरोबर” या अहंकारात ते वावरतात. सोबत विचार करणारे, प्रश्न विचारणारे किंवा स्पष्ट बोलणारे लोक त्यांना आवडत नाहीत. कारण सत्य ऐकण्याची ताकद अहंकारात नसते.
हुजेरी करणारे, हो ला हो म्हणणारे आणि फक्त स्तुती करणारे लोक त्यांना चांगले वाटतात. पण जे स्पष्टपणे वास्तव मांडतात, अन्यायावर बोलतात, चुकीला चुकी म्हणतात — त्यांनाच “विरोधक”, “बंडखोर” किंवा “चुकीचे” ठरवले जाते. वरून “एक व्हा”, “संघटित राहा” असे सांगितले जाते; पण आतून मात्र विषमता पसरवली जाते. गटबाजी केली जाते. गरीब, सामान्य आणि संघर्ष करणाऱ्या माणसाला कमी लेखले जाते.
आज समाजात गरीबाचा राग केला जातो, पण त्याच्या वेदना समजून घेतल्या जात नाहीत. मेहनत करणारा माणूस मागे पडतो आणि दिखावा करणारे पुढे जातात. पद मिळाले की काही लोकांना वाटते त्यांनी माणुसकीच विकत घेतली आहे. पण खरे मोठेपण खुर्चीत नसते, ते वागण्यात असते.
माणूस जोडणे कठीण असते आणि तोडणे खूप सोपे. म्हणून जो माणसाला सन्मान देतो, त्याच्या विचारांना ऐकतो, मतभेद असूनही सोबत घेऊन चालतो — तोच खरा नेता आणि तोच खरा माणूस. बाकी पदे, सत्ता आणि प्रसिद्धी या क्षणिक गोष्टी आहेत.
समाजाला आज गरज आहे ती मोठमोठ्या घोषणांची नाही, तर माणुसकीची. जात, धर्म, पैसा, पद या चौकटींपलीकडे जाऊन प्रत्येकाला माणूस म्हणून स्वीकारण्याची. स्पष्ट बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याऐवजी त्यातून सत्य समजून घेण्याची. कारण आरसा कधीच खोटे बोलत नाही.
म्हणूनच आज पुन्हा एकदा सांगावेसे वाटते —
“जगण्याला मरण म्हणालो नाही…
डबक्याला धरण म्हणालो नाही…
इतकेच मी म्हणालो —
सन्मान द्या माणसाला…!”
आपलाच
प्रफुल्ल मंदा श्रीधर जिल्हाकार्याध्यक्ष
महा. अनिस अमरावती.

