जनगणने सारख्या महत्त्वाच्या कामात बेजबाबदार पणा!




 जनगणने सारख्या महत्त्वाच्या कामात बेजबाबदार पणा!

उपसंपादक संतोष भालेराव 

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील गौरखेडा कुंभी येथे भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जनगणना मोहिमेच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. जनगणना २०२६/२७ ही देशातील नागरिकांची सामाजिक, आर्थिक व लोकसंख्यात्मक माहिती संकलित करून शासनाच्या विविध योजनांचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम मानली जाते. मात्र या मोहिमेअंतर्गत माहिती संकलन करताना अधिकृत नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणारी जनगणना २०२६/२७ ही देशातील प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती संकलित करून त्यानुसार शासनाच्या योजना, सुविधा, निधी वाटप, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा व सामाजिक विकासाचे धोरण निश्चित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक व कौटुंबिक माहिती शासनाकडे संकलित केली जात असल्याने ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, अधिकृत व सुरक्षित पद्धतीने होणे अपेक्षित आहे.

मात्र अचलपूर तालुक्यातील गौरखेडा कुंभी येथे जनगणना मोहिमेच्या कामकाजात गंभीर निष्काळजीपणा व भोंगळ कारभार समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका नागरिकाच्या घरी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास एक युवक पोहोचला व त्याने संबंधित नागरिकाला “तुमचं नाव काय आहे?” अशी विचारणा केली. सुरुवातीला कोणतीही ओळख अथवा अधिकृत माहिती न देता विचारणा करण्यात आल्याने नागरिकाला संशय आला.

नागरिकाने संबंधित युवकास विचारणा केली असता त्याने “ते सर तिथे उभे आहेत, त्यांनी विचारायला सांगितले,” असे उत्तर दिले. त्यानंतर संबंधित नागरिकाने त्या व्यक्तीकडे जाऊन चौकशी केली असता त्यांनी स्वतःला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असल्याचे सांगितले व आपले नाव “काकडे” असल्याचे नमूद केले. तसेच “मी जनगणनेचे काम करण्यासाठी आलो आहे,” असेही त्यांनी सांगितले.

मात्र नागरिकाने त्यांच्याकडे शासनाने जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, नियुक्ती आदेश अथवा जनगणना विभागाशी संबंधित कोणतेही प्राधिकृत दस्तऐवज दाखविण्याची मागणी केली असता संबंधितांकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र नसल्याचे समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारे कोणतीही खात्री न देता नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा केली जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे ज्या नागरिकाकडे माहिती विचारण्यात आली तो स्वतः जागरूक नागरिक तसेच पत्रकार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गावातील लोकांमध्ये “जर कोणीतरी अधिकृत अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, कागदपत्रे अथवा इतर संवेदनशील माहिती घेतली आणि त्याचा गैरवापर झाला तर जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नसून नागरिकांच्या गोपनीयतेशी व संवेदनशील माहितीसोबत संबंधित विषय आहे. त्यामुळे जनगणना कार्यात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी शासनमान्य ओळखपत्र बाळगणे, नागरिकांना स्वतःची स्पष्ट ओळख करून देणे, माहिती संकलनाचा उद्देश सांगणे तसेच पारदर्शक पद्धतीने काम करणे आवश्यक मानले जाते. मात्र गौरखेडा कुंभी येथे या मूलभूत बाबींचेच पालन होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कायद्याच्या दृष्टीने पाहता, कोणत्याही शासकीय मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी अधिकृत ओळखपत्राशिवाय नागरिकांकडून माहिती गोळा करणे हे निष्काळजीपणाचे कृत्य मानले जाऊ शकते. तसेच नागरिकांची फसवणूक, माहितीचा गैरवापर किंवा बनावट प्रतिनिधींचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती तंत्रज्ञान कायदा, गोपनीयता हक्क तसेच प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, जनगणना मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकृत फोटो ओळखपत्र बंधनकारकपणे बाळगावे, गावांमध्ये पूर्वसूचना द्यावी, नागरिकांना अधिकृत माहितीपत्रक उपलब्ध करून द्यावे तसेच अशा प्रकारच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष देखरेख करावी.

दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी तसेच भविष्यात नागरिकांची फसवणूक किंवा माहितीचा गैरवापर होणार नाही याची प्रशासनाने हमी द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post