ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून फेस अटेंडन्स सक्तीला विरोध
अनेक ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार असल्याने अडचणी वाढल्याची भावना
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
Amaravati,चांदूर रेल्वे : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी “फेस अटेंडन्स” प्रणाली सक्तीने लागू करू नये, अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाकडून करण्यात आली आहे. याबाबत गट विकास अधिकारी, पंचायत समिती चांदूर रेल्वे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदनात जिल्हा परिषद अमरावती यांच्या दिनांक ४ मे २०२६ च्या पत्राचा तसेच ग्रामपंचायत अधिकारी जिल्हा संघटना शाखा अमरावती यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून फेस अटेंडन्ससाठी करंट लोकेशनची माहिती मागविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच माहिती वेळेत सादर न झाल्यास वेतन प्रक्रियेत अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाने मांडलेल्या भूमिकेनुसार, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने एका अधिकाऱ्याकडे दोन ते चार ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्याचबरोबर विविध विभागांच्या आढावा बैठका, पाणीपुरवठा योजनांसाठी साहित्य खरेदी, पत्रव्यवहार, अंदाजपत्रक मिळविणे आदी कामांसाठी वारंवार मुख्यालय सोडावे लागते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून फेस अटेंडन्स देणे व्यवहार्य नसल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये अशा प्रकारची सक्ती नसताना अमरावती जिल्हा परिषदेमध्येच फेस अटेंडन्सची अंमलबजावणी केली जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. विपरीत परिस्थितीतही ग्रामपंचायत अधिकारी प्रशासनाची कामे प्रभावीपणे पार पाडत असून फेस अटेंडन्सची सक्ती करू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


