किनवट पोलिसांची कारवाई : ६०० लिटर मोहफुलाचे रसायनयुक्त फसफस जप्त

 



किनवट पोलिसांची कारवाई : ६०० लिटर मोहफुलाचे रसायनयुक्त फसफस जप्त


विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

किनवट : किनवट पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू निर्मिती प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे रसायनयुक्त फसफस जप्त केले आहे. या प्रकरणी एक आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास मौजे भूलजा शिवारातील तोटरे यांच्या वीटभट्टीजवळील झोपडीच्या अंगणात ही कारवाई करण्यात आली. ही जागा किनवट शहरापासून दक्षिणेस अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर आहे.

या प्रकरणी गुरन क्र. १०३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (E)(F) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दि. १६ मे २०२६ रोजी दुपारी २.५३ वाजता ठाणे दैनंदिनी क्रमांक २८ वर किनवट पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला.

फिर्यादी प्रदीपकुमार तुळशीराम आत्राम (वय ४२), नेमणूक HC 984, पोलीस स्टेशन किनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नानंग गोबरा ढमाळ (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. बोधडी खुर्द, ता. किनवट, जि. नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन निळ्या रंगाच्या २०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाक्यांमध्ये साठवून ठेवलेले एकूण ६०० लिटर मोहफुलाचे फसफसयुक्त रसायन जप्त केले. या मुद्देमालाची अंदाजे किंमत ३६ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post