पनवेलमध्ये पत्रकार उत्कर्ष समितीचा १० वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

 



पनवेल (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) : पत्रकारिता क्षेत्रातील कार्याला प्रेरणा देणारा आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना गौरविणारा पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र राज्य यांचा १० वा वर्धापन दिन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ सोमवार दिनांक ११ मे रोजी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


कार्यक्रमाची सुरुवात "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" या उक्तीनुसार पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.ममता प्रीतम म्हात्रे,महिला उत्कर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा डॉ. स्मिता अजय पाटील, उपाध्यक्ष सौ.आरती पाटील,सचिव ॲड एम.दिव्या लोकरे तसेच इतर मान्यवर महिलांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यानंतर सुमधुर आवाजात गणेश वंदना सादर करण्यात आली. पुढे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा…” या महाराष्ट्र गीताने वातावरण भारावून गेले. गायक अलंकार भोईर व विश्वनाथ गायकवाड यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना जागृत झाली.


पत्रकार उत्कर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष दिवंगत राम जाधव यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच समितीतर्फे त्यांच्या पत्नी सौ. निशा जाधव यांचा माहेरवाशिणीचा सन्मान साडी-चोळी देऊन करण्यात आला. या कृतीतून पत्रकार उत्कर्ष समिती आपल्या सहकाऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडत नाही, तर त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहते, हे अधोरेखित झाले.


कार्यक्रमात पत्रकार उत्कर्ष समितीच्या महिला व पुरुष सदस्यांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यानंतर “पत्रकार उत्कर्ष समिती वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा स्मरणिका २०२६” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आदर्श सेवाव्रती पुरस्कार आर्या अजय देशमुख व डॉ. दिपाली उमाळे, लोककला गौरव पुरस्कार दत्ता हरी भोईर व दिगंबर धर्मा कोळी, समाजरत्न पुरस्कार गजानन देशमुख, आदर्श पत्रकार पुरस्कार गणेश राऊत व राजन देसाई, आदर्श शिक्षक पुरस्कार ज्योती वाघ व सुनील दरवडा, साहित्यरत्न पुरस्कार वृषाली टाकले व सरोज अंदणकर, आदर्श कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. नकुल महाराज भोईर व ह.भ.प. विक्रम महाराज थोरवे, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शंकर शिंदे, आदर्श संस्था पुरस्कार स्नेहज्योत संस्था (मुंबई) तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार विजयकुमार राठोड यांना प्रदान करण्यात आले.


तसेच “पंचज्योती सन्मान” या विशेष राज्यस्तरीय पुरस्काराने पाच मानकरी महिलांचा गौरव करण्यात आला. ॲड. अनिशा फणसळकर यांना “न्यायज्योत”, मीना घोडविंदे यांना “सेवाज्योत”, मोनिका शिंपी यांना “गिरीजन उद्धार ज्योत”, रेखा पाटील यांना “शृंगार ज्योत” आणि समता ठाकूर यांना “ज्ञानज्योत” गौरव पुरस्कार देण्यात आले.


कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तसेच शिवसेना (शिंदे गट) पनवेल तालुका अध्यक्ष परेश पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार उत्कर्ष समितीच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचे मत व्यक्त केले.


कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी लोककलावंत दत्ता हरी भोईर यांच्या “आई एकविरा सांस्कृतिक कलामंच”च्या टीमने कोळीगीते व बहारदार लावणी सादर करत प्रेक्षकांचे मन जिंकले. या सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.


कार्यक्रमाचे निवेदन प्रा. अक्षय पाटील (पेण) व पंडित सर (उरण) यांनी अत्यंत प्रभावी व सुरेख शैलीत केले. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाची पकड शेवटपर्यंत टिकून राहिली.


या यशस्वी सोहळ्यामागे पत्रकार उत्कर्ष समितीचे सर्वेसर्वा अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपूर्ण टीममधील पदाधिकारी, तसेच पत्रकार बंधू-भगिनींनी दिलेला मोलाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरला. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हा भव्य कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.


एकूणच, पत्रकार उत्कर्ष समितीचा हा वर्धापन दिन व पुरस्कार सोहळा केवळ सन्मानाचा नव्हे, तर प्रेरणा देणारा, समाजकार्याला चालना देणारा आणि सांस्कृतिक समृद्धीचा उत्सव ठरला. उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.




Post a Comment

Previous Post Next Post