पाटबंधारे कार्यालयात कर्मचारी गैरहजर, मात्र फॅन-लाईट सुरूच
शासकीय वीजेचा अपव्यय; नागरिकांकडून चौकशीची मागणी
📍 धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे येथील पाटबंधारे विभागाच्या स्थानिक कार्यालयामध्ये कर्मचारी अनुपस्थित असतानाही कार्यालयातील फॅन, लाईट व इतर विद्युत उपकरणे सुरू असल्याचे चित्र समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कार्यालयात कोणीही उपस्थित नसताना दिवसभर वीज उपकरणे सुरू ठेवली जात असल्याने शासकीय वीजेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा कामानिमित्त कार्यालयात गेल्यानंतर संबंधित कर्मचारी उपस्थित नसतात. मात्र कार्यालयातील फॅन, लाईट तसेच काही ठिकाणी संगणक व इतर उपकरणे सुरू अवस्थेत दिसून येतात. यामुळे शासनाच्या वीज बचत मोहिमेला हरताळ फासला जात असून शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे सामान्य नागरिकांना वीज बचतीचे आवाहन करण्यात येते, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच वीजेचा निष्काळजीपणे वापर होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कार्यालयातील उपस्थिती, कामकाजाची वेळ व वीज वापराबाबत चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच कार्यालयात कर्मचारी नियमित उपस्थित राहतात का, कार्यालयीन वेळेत कामकाज सुरळीत सुरू असते का आणि वीज उपकरणे विनाकारण सुरू ठेवण्यास जबाबदार कोण, याची सखोल चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे शासकीय मालमत्तेचा अपव्यय थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे..

