विवाह सोहळ्यातील शिस्तीसाठी बौद्ध मंगल परिणय नियमन समितीचा पुढाकार; उशिरा लागलेल्या विवाहप्रकरणी दंड आकारला
Editor Milind jamnik
अकोला - बुद्ध विहार समन्वय महासंघ यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलेल्या बौद्ध मंगल परिणय नियमन समिती तर्फे बौद्ध समाजातील विवाह सोहळे वेळेवर आणि शिस्तबद्ध पार पडावेत यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष धम्म बोधी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली समाजात सदाचार व शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दि. १२ मे २०२६ रोजी बुद्ध विहार समिती लेबर कॉलनी येथे गवई परिवार आणि जामनिक परिवार यांचा विवाह सोहळा नियोजित वेळेपेक्षा उशिरा पार पडल्याने समितीने संबंधितांकडून धम्मकार्याकरिता पाचशे रुपयांचा दंड आकारला. सामाजिक कार्यकर्ते निरंजन इंगळे यांच्या हस्ते हा दंड स्वीकारण्यात आला. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष तथा माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे उपस्थित होते.या विवाह विधीस माजी सभापती तुळसाबाई इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाह सोहळ्यादरम्यान काही तरुणांकडून वधू-वरांना पादत्राणांसह उचलून नेण्याच्या प्रकारांवरही समितीने नाराजी व्यक्त केली. अशा कृतींमुळे विवाह विधीचे गांभीर्य कमी होऊन तो केवळ मनोरंजनाचा भाग बनत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.बौद्ध समाजातील विवाह परंपरेत शिस्त, वेळेचे भान आणि सामाजिक मूल्यांचे जतन व्हावे, यासाठी समाजबांधवांनी पुढे येण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. समितीच्या या निर्णयाचे समाजात स्वागत होत असून “वेळेवर लावा लग्न; समाजात जगा सन्मानाचे जीवन” हा संदेश दिला जात आहे.
