नाकाबंदीच्या नावाखाली दागिने व पैसे घेण्याचे प्रकार ; संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलिसांना कळविण्याचे आवाहन
Editor Milind jamnik
मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यात काही भामटे पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
माहितीनुसार, काही भामटे रस्त्यावर नाकाबंदी सुरू असल्याचे सांगून नागरिकांना थांबवतात. त्यानंतर “तुमच्या जवळील दागिने काढून कागदाच्या पुडीत बांधा” असे सांगून चौकशीच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी भीती निर्माण करून आर्थिक लाभ घेण्याचाही प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी नागरिकांकडून अशा प्रकारे प्रत्यक्ष जाऊन पैसे, दागिने किंवा आर्थिक व्यवहाराची मागणी करत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःला पोलीस म्हणवून घेणाऱ्या अनोळखी व्यक्तींची ओळख खात्रीशीरपणे पडताळून पाहावी.
तसेच भीती, दबाव किंवा कारवाईची धमकी देऊन कोणी पैसे किंवा मौल्यवान वस्तू मागत असल्यास त्वरित सावध व्हावे. अशा व्यक्तींना रोख रक्कम अथवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.अकोला पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी अफवा आणि फसवणूक करणाऱ्या भामट्यांपासून स्वतःसह समाजाचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------------------------------------------
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. पोलीस असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्राद्वारे खात्री करून घ्यावी. फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांची सजगता महत्त्वाची आहे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी.
अजीत जाधव, ठाणेदार
शहर पोलीस स्टेशन, मूर्तिजापूर
