बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; तात्काळ निलंबन व विभागीय चौकशीची मागणी



बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; तात्काळ निलंबन व विभागीय चौकशीची मागणी 


Deputy Editor Santosh Bhalerao 

अमरावती | प्रतिनिधी

धारणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बैरागड येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मदीप बाळू भगत यांच्या विरोधात गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा, शासकीय सेवेत शिस्तभंग तसेच तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणी तात्काळ निलंबन व उच्चस्तरीय विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनावर एड. आकाश डी. धुर्वे, एड. प्रेमलाल एम. सावळकर आणि एड. श्रीकांत बी. पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, संबंधित प्रकरणात कठोर प्रशासकीय हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रातील गंभीर घटनांबाबत यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित प्रकरणात कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ बदलीची सौम्य कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या सौम्य भूमिकेमुळे अशा गंभीर घटनांना पुन्हा खतपाणी मिळत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तक्रारीनुसार, वैद्यकीय निष्काळजीपणा, शासकीय अभिलेखांमध्ये चुकीच्या नोंदी, तथ्य लपविण्याचा प्रयत्न तसेच वरिष्ठ प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी न होणे या बाबींमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही कोणतीही ठोस प्रशासकीय कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होत असून, यामुळे शासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कमी होत आहे. या प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

तसेच, यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा थडी, तालुका चांदूरबाजार येथील मृत्यू प्रकरणातही डॉ. धम्मदीप भगत यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, त्या वेळीही कठोर कारवाई न करता केवळ बदली करण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

डॉ. धर्मदीप बाळू भगत यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.

सदर प्रकरणात स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय विभागीय चौकशी आदेशित करण्यात यावी.

चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची कोणत्याही संवेदनशील पदावर नियुक्ती करू नये.

दरम्यान, या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील कार्यपद्धती व प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post