( वेंगुर्ले / आशा रणखांबे )
विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन, वेंगुर्ले यांच्या वतीने आयोजित दहाव्या ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार’ सोहळ्यात वाशीम येथील कवी महेंद्र ताजणे यांना त्यांच्या ‘खूप काही आणखी’ या काव्यसंग्रहासाठी सन्मानित करण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या सोहळ्याचे आयोजन कवयित्री मनीषा जाधव यांच्या ‘पुन्हा नव्याने’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव होते. यावेळी आंबेडकरी साहित्यिक सुनील हेतकर, कवी व समीक्षक वीरधवल परब, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर, डॉ. राजेंद्र मुंबरकर, कवयित्री संध्या तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना कवी महेंद्र ताजणे यांनी सांगितले की, बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारांवर आधारित कविता भविष्यात टिकून राहील. “हा पुरस्कार माझ्या कवितेला नवसंजीवनी देणारा असून मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी माझ्या लेखनाला अधिक बळ देईल,” असे त्यांनी नमूद केले. प्रमुख वक्ते सुनील हेतकर यांनी आपल्या भाषणात विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, समाजप्रबोधनासाठी अशा संस्थांची गरज अधोरेखित केली. तर कवी वीरधवल परब यांनी मनीषा जाधव यांच्या ‘पुन्हा नव्याने’ या काव्यसंग्रहातील सामाजिक आशय आणि चिंतनशील अभिव्यक्तीचे विश्लेषण केले. उद्घाटक जयप्रकाश चमणकर यांनी सांगितले की, या फाऊंडेशनच्या कार्यामुळे वेंगुर्ल्याचे नाव राज्यभर पोहोचले असून साहित्य चळवळीला नवे बळ मिळाले आहे. अध्यक्षीय भाषणात इंजि. अनिल जाधव यांनी बौद्ध धम्म आणि संविधानिक मूल्ये आचरणात आणण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील साहित्यिक, विचारवंत व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजित कवी संमेलनात अनेक कवींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रास्ताविक सुनिल जाधव यांनी मांडले, तर आभार विदिशा जाधव यांनी केले.
