घरातील सदस्य उपस्थित असताना थोडक्यात अनर्थ टळला
पालघर प्रतिनिधी | सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हिरवे-घानवळ अंतर्गत येणाऱ्या घानवळ गावातील रहिवासी रामजी जानू नडगे यांच्या कुटुंबावर निसर्गाच्या अवकृपेने मोठे संकट कोसळले आहे. आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घरावरील पत्रे उडून गेली.
घटना घडली त्यावेळी घरातील सर्व सदस्य घरात उपस्थित होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. अचानक आलेल्या वादळामुळे घरातील धान्य, कपडे तसेच इतर जीवनावश्यक वस्तू भिजून मोठे नुकसान झाले आहे.
रामजी नडगे यांचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असून, गावात मिळेल ते काम व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहे. कुटुंबात एकूण आठ सदस्य वास्तव्यास आहेत. घराचे मोठे नुकसान झाल्याने कुटुंबीयांसमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
घटनेनंतर कुटुंबातील महिलांना अश्रू अनावर झाले असून, शासन प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी केली आहे.



