विशेष प्रतिनिधी/ पंकज जयस्वाल
नंदुरबार – देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषित करून गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ईस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राज्याध्यक्ष एजाज बागवान यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारत हा विविध धर्म, संस्कृती व परंपरांचा संगम असलेला भाईचाऱ्याचा देश आहे. हिंदू धर्मात गाईला गोमाता म्हणून मान दिला जातो. भारतीय शेती व्यवस्थेत देशी गाईचे योगदान महत्त्वपूर्ण असून शेणखत, गोमूत्र, सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत तिचा मोठा वाटा आहे. गाईचे संवर्धन केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होईल तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. त्यामुळे देशी गाईला राष्ट्रीय पशु घोषित करून तिच्या संवर्धनासाठी विशेष कायदे, योजना व संरक्षण धोरणे राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच गोरक्षणाच्या नावाखाली काही तथाकथित संघटना व समाजकंटकांकडून जनावरांची वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची वाहने अडविणे, जनावरे हिसकावून नेणे, वाहनांची तोडफोड करणे, मारहाण करणे, मॉब लिंचिंगसारख्या घटना घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या विरोधात जातीय सलोखा बिघडविणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोरक्षणाच्या नावाखाली निर्माण होणारी दहशत रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
या वेळी जमाते उलेमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना जकरीया, सदा जनसेवा फाऊंडेशनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. मजहर शेख, काँग्रेस रोजगार स्वयंरोजगारचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस दत्तूभाऊ पवार, मन्यार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नासीर मन्यार, जावीद शेख, इमरान मन्यार, प्रताप सोनवणे, पांडुरंग गवळी, छोटू पवार, अर्जुन मालवे, ओम पुरी आदी उपस्थित होते.

