मृत्यूच्या दाढेत असलेल्या निष्पाप श्वानांना विजय आमले यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले जीवदान; प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाईची मागणी
गावाकडची बातमी प्रतिनिधी : पंकज जयस्वाल, माहूर-किनवट (नांदेड)
मो. ९४२१३६७५९३
माहूर नगर पंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेच्या नावाखाली मुक्या प्राण्यांना अन्न-पाण्याविना मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. घनकचरा डेपो परिसरात तीन दिवसांपासून अन्न-पाण्याविना तडफडणाऱ्या तीन निष्पाप कुत्र्यांना जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले व पत्रकार राम दातीर यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले.
माहूर शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी नगर पंचायतीने लसीकरण व नसबंदी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान पकडलेल्या कुत्र्यांना डम्पिंग ग्राउंडवरील एका गोदामात डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, येथे अत्यंत अमानुष प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. नसबंदी झालेल्या या कुत्र्यांना ना अन्न देण्यात आले, ना पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली. अनेक दिवस उपाशीपोटी ठेवण्यात आल्याने या मुक्या जीवांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.
नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे गोदामात ठेवलेली कुत्री जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागली. त्यापैकी तीन कुत्रे जवळील उघड्या पाण्याच्या हौदात व कोरड्या टाकीत पडले होते. गेल्या तीन दिवसांपासून ते जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते. मात्र, नगर पंचायतीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने याकडे फिरकूनही पाहिले नाही. त्यामुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पैसा हृदयाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले व त्यांचे सहकारी पत्रकार राम दातीर यांनी तातडीने कचरा डेपो परिसर गाठला. तेथे तीन निष्पाप कुत्रे शेवटच्या घटका मोजत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन स्वीकारला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाची संवेदनशून्यता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मदतीची कोणतीही आशा नसताना विजय आमले यांनी पुढाकार घेत घंटागाडी चालक संजय राठोड, हिरासिंग चव्हाण, सफाई कर्मचारी बाबाराव डोके तसेच स्थानिक शेतकरी ईजाज खान समशेखान यांच्या मदतीने हौदात पडलेल्या कुत्र्यांना बाहेर काढले. त्यांना बिस्कीट व पाणी देऊन जीवदान देण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्याने त्या निष्पाप जीवांचे प्राण वाचले.
मुक्या प्राण्यांना अन्न-पाण्याविना ठेवून त्यांचा अमानुष छळ करणाऱ्या नगर पंचायत प्रशासनावर कारवाई होणार का, असा प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. शासन एकीकडे प्राणीमात्रांवर दया करा आणि प्राण्यांचे संरक्षण करा, असे संदेश देत असताना दुसरीकडे प्रशासनाकडून होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून माहूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्यासह संबंधित दोषींवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.

