ब्राम्हाणवाडा थडी, शिजरगाव कसबा व खरपी टी पॉईंट परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; कारवाईची मागणी

 




अमरावती : जिल्ह्यातील ब्राम्हाणवाडा थडी, शिजरगाव कसबा ता. चांदूर बाजार तसेच खरपी टी पॉईंट ता. अचलपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधितांकडे महाराष्ट्र शासनाची कोणतीही वैध परवानगी नसतानाही दिवसाढवळ्या मुरूम उत्खनन सुरू असल्याने महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत विना रॉयल्टी आणि ओव्हरलोड मुरूम वाहतूक केली जात आहे. अनेक वाहने नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर धावत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याची चर्चा आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वाहनधारक व अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकारामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post