माहूर तालुक्यातील वाई, आष्टा तसेच सिंदखेड-वानोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण व कर्मचाऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव जाणवत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पिंटू पाटील वायफनिकर यांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध पाणी शुद्ध नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे वाई, आष्टा तसेच सिंदखेड-वानोळा येथील आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने वॉटर फिल्टर बसवून स्वच्छ पाण्याची नियमित सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तहसीलदारांनी या मागणीची दखल घेत लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी युवासेना तालुका संघटक व युवा पत्रकार गोपाळ नाईक उपस्थित होते.




