माहूर येथे “शिवाजी कोण होता?” पुस्तकाचे जाहीर वाचन; कारवाईची मागणी

 

 



माहूर  – ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर माहूर येथे जाहीर वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.



बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या शीर्षकावरून सध्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांच्या कुटुंबीयांबाबत अर्वाच्च भाषा वापरून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनैतिहासिक व खोटे वक्तव्य केल्याने शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या निषेधार्थ माहूर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड, कम्युनिस्ट पक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर पुरोगामी संघटनांच्या वतीने दि. २७ रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले.

या कार्यक्रमाला कॉ. डॉ. बाबा डाखोरे, ज्येष्ठ पत्रकार कादरभाई दोसानी, कॉ. किशोर पवार, अंनिसचे तालुकाध्यक्ष मनोज कीर्तने, जयकुमार अडकीने, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मंगेश जाधव, तसेच प्रवीण बरडे, समाधान कांबळे, निरंजन जमदाडे, दीपक कांबळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात वक्त्यांनी आपल्या मनोगतातून आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि लेखक गोविंद पानसरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

सदर निवेदन स.पो.नि. शरद घोडके यांच्या मार्फत देण्यात आले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post