छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांनी रायगडावर नतमस्तक होऊन जाहीर माफी मागावी – राज पाटील, जिल्हाध्यक्ष मनसे अमरावती

 

उपसंपादक/संतोष भालेराव 

अमरावती, अचलपूर :

महाराष्ट्राची पावन भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पवित्र झालेली आहे. जगभरात आदर्श मानल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल चुकीचे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप बागेश्वर बाबा यांच्यावर करण्यात आला आहे.

मनसेचे अमरावती जिल्हाध्यक्ष राज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि स्वराज्य संकल्पना यांना कोणत्याही ऐतिहासिक आधाराशिवाय दुसऱ्यांच्या नावाशी जोडण्याचा प्रयत्न समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण करणारा आहे. शिवाजी महाराजांनी बहुजनांच्या कल्याणासाठी न्याय्य आणि समताधिष्ठित स्वराज्य उभारले, हेच त्यांच्या कार्याचे खरे वैशिष्ट्य आहे.



शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास यांना गुरू मानले किंवा राज्यकारभार त्यांना समर्पित केला, याचा ठोस ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे अशा प्रकारचे दावे समाजात चुकीचे समज पसरवणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.


मनसेच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:

संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करण्यात यावी.

अपमानास्पद वक्तव्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

भविष्यात महान व्यक्तिमत्त्वांबद्दल चुकीची विधाने होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात.

बागेश्वर बाबांनी शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी.

तसेच, राज्य सरकारने या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना विजय पोटे, पुरुषोत्तम काळे, दिलीप गुलरेकर, अक्षय काजे, रुपेश शर्मा, आकाश पातुरकर, ऋषिकेश सालकुटे, हर्ष माकोडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post