“माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
Amaravati: “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी बेसलाईन असेसमेंट करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करणे आवश्यक आहे. तसेच या समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी केले.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढील एका वर्षात करावयाच्या कामांचे स्पष्ट नियोजन करणे आवश्यक असून अभियानातील पॅरामीटर्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांचा सखोल अभ्यास करून पुढील कृती आराखडा तयार करावा, असे त्यांनी नमूद केले.
या अभियानाचा नियमित आढावा विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याने तालुकानिहाय नियोजन करून जिल्हास्तरावर एकत्रित आराखडा तयार करावा व त्यानुसार काम सुरू करावे. तसेच यंत्रणेने नियमित कामकाज अधिक सुदृढ करत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. बनसोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र सीरसाट, डॉ. क्षीरसागर, डॉ. स्वप्नील मालखेडे, डॉ. शरद जोगी, डॉ. पूनम मोहोकार तसेच समता फाउंडेशनचे रजनीकांत बिरजवार उपस्थित होते.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात सनियंत्रण समिती अंतर्गत ‘गाव कृती समिती’ या विषयावर डॉ. सालफळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच परिशिष्ट अ, ब व क यावर अनुक्रमे डॉ. निकोसे व डॉ. अंकुश मानकर यांनी माहिती दिली. अंतिम अंमलबजावणी या घटकांतर्गत प्रवेशिका सादरीकरण या विषयावर डॉ. सोनाली देशमुख, पुरस्कार स्वरूपाबाबत डॉ. शिल्पा बोरकर आणि कृती आराखड्याविषयी डॉ. तिलोत्तमा वानखडे यांनी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण परिसे यांनी केले. त्यांनी अभियानाचे उद्दिष्ट, ध्येय व धोरण स्पष्ट करत “आरोग्य ही सामुदायिक जबाबदारी असून त्यासाठी सर्व विभागांचा समन्वय अत्यावश्यक आहे,” असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकुश मानकर व डॉ. सोनाली देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. स्वप्नील मालखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

