पंचायत राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी त्रिस्तरीय रचनेतून सर्वांनी लोककल्याणाच्या दृष्टीने कार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांनी केले. “पंचायत राज व्यवस्थेचा उद्देश प्रभावीपणे साध्य करणे हीच खरी पंचायत राज दिनाची पावती ठरेल,” असेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषद अमरावतीच्या सभागृहात पंचायत विभागामार्फत राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांमध्ये एकाचवेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
आपल्या भाषणात सीईओ गांधी यांनी ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत कार्यरत असलेल्या पंचायत राज संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांच्या गरजा ओळखून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच पारदर्शकता व उत्तरदायित्व जपावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, तसेच सहायक गट विकास अधिकारी मीना मसतकर व सुनील गवई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम कुलकर्णी यांनी केले. त्यांनी पंचायत राज दिनाचे महत्त्व व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
