माहूर शहरात चिडीमार विरोधी पथकाची स्थापना करण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक व युवासेना तालुकाप्रमुख सोनू चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना माहूर शहरप्रमुख राणा ऊर्फ विजयसिंह बजरंगसिंह हजारी यांनी युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशन माहूर येथे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांना १७ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, माहूर शहर हे तिर्थस्थळ व तालुकास्थळ असल्याने याठिकाणी भाविकांसह, नागरिकांची सतत गर्दी होत असते. त्यातच धार्मिक स्थळे,
बसस्थानक, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बाजारपेठ यासह गजबजलेला भाग परिसर असलेल्या गर्दीच्या ठिकाणी अनेकदा चीडीमार (रोड रोमिओ) टवाळखोरांकडून
महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
या संवेदनशील प्रकरणांपैकी अपवाद वगळता नुसती ओरड होते, पोलीस तक्रार नाही. नुकतीच अमरावती जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत गंभीर असून माहूर शहरात अशा घटना घडू नयेत यासाठी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अनेकदा सामाजिक बदनामीची भीती, कुटुंबाची प्रतिष्ठा, आरोपीकडून मिळणाऱ्या धमक्या, पोलीस कार्यवाहीबद्दल अविश्वास आणि प्रक्रियेतील विलंब ही
मुली व महिलांच्या छेडछाडीच्या घटनेची पोलिसात तक्रार न होण्याची मुख्य कारणे आहेत.
अनेकदा 'लोक काय म्हणतील' या मानसिकतेमुळे, तसेच पीडितेवरच उलट प्रश्न उपस्थित केले जाण्याच्या भीतीमुळे तक्रारी टाळल्या जातात. कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी घरातील प्रतिष्ठित महिला किंवा पुरुष प्रकरणावर पडदा टाकण्यास सांगतात.महाराष्ट्रात मुलींच्या व महिलांच्या छेडछाडी रोखण्यासाठी प्रामुख्याने 'दामिनी पथक' आणि 'निर्भया पथक' काम करतात. ही पथके शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाई करतात.
याच धर्तीवर माहूर शहरात विशेषतः जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे जवळील वडाच्या झाडाखालील हनुमान मंदिर परिसर, कपिलनगर येथील कपिलेश्वर मंदिर परिसर, पांडवलेणी परिसर, श्री जगदंबा हायस्कूल परिसर,
श्री रेणुकादेवी महाविद्यालय परिसर, बस स्थानक परिसर यासह गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोर
चिडीमारी करणाऱ्या विरोधात चिडीमार विरोधी पथकाची स्थापना करणे ही सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना (रोड रोमिओ) धडा शिकविणे माहूर सारख्या श्री रेणुकादेवीचे शक्तीपीठ असलेल्या पवित्र ठिकाणच्या नारी शक्तीचा सन्मान म्हणून काळाची गरज आहे.
जेणेकरून महिला व मुलींच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल असा विश्वास निवेदनातून युवासेना शहरप्रमुख राणा यांनी व्यक्त केला आहे.
निवेदनावर राणा यांच्या सह सोनू चौधरी,ओम केशवे, भावेश शेवाळे, नकुल पस्पुलवार, शिव सोनुने, सूरज लहानकर, सागर मोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


