लग्नाची पत्रिका देऊन परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात नवरीसह दोघींचा मृत्यू

 




उपसंपादक – संतोष भालेराव

अचलपूर /परतवाडा

परतवाडा शहरालगतच्या देवमाळी येथील एका कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला असून, लग्नाची पत्रिका देऊन सप्तशृंगी गडावरून परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात नवरीसह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यातील भांबरुड महादेवाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, देवमाळी येथील काशिकर कॉलनी परिसरात राहणारी शिखा विनायक बेलसरे हिचा विवाह येत्या ८ मे रोजी निश्चित झाला होता. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी तसेच कुलदेवीचे आशीर्वाद घेण्यासाठी शिखा, तिचे नातेवाईक हरम निवासी सुनील मानकर, मीना मानकर आणि देवमाळी येथील शुभम बेलसरे हे सप्तशृंगी गडावर गेले होते.

दर्शन घेऊन परत येत असताना जळगाव जिल्ह्यातील भांबरुड महादेवाजवळ त्यांच्या वाहनाचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.

या अपघातात शिखा विनायक बेलसरे आणि मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २९ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.

अवघ्या काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना, ज्या घरामध्ये सनई-चौघड्यांचे सूर घुमणार होते, त्या घरात आता शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे देवमाळी आणि हरम परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.






Post a Comment

Previous Post Next Post