किनवट: संत सेवालाल महाराज बंजारा, लभान तांडा समृद्धी योजना (सन २०२४–२५) अंतर्गत किनवट तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये मंजूर विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता, निकृष्ट दर्जा व अपूर्ण कामे झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात तक्रारदार विनोद शंकर पवार व सुनील गंभीरा राठोड यांनी पंचायत समिती, किनवट येथे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार २२ एप्रिल २०२६ रोजी बांधकाम विभागाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, आदेशानंतरही प्रत्यक्ष चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तक्रारदारांनी याबाबत स्मरणपत्र सादर करून गुणनियंत्रण कक्षामार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारदारांना उपस्थित ठेवावे, तसेच टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
“चौकशीचे आदेश असूनही कारवाई होत नसेल, तर अनियमितता दडवण्याचा प्रयत्न असल्याचा संशय निर्माण होतो. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.
दरम्यान, ३० एप्रिल २०२६ पर्यंत चौकशी पूर्ण न झाल्यास पंचायत समिती कार्यालय, किनवट येथे आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदारांनी दिल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर बंजारा समाजात तीव्र नाराजी पसरली असून परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत असून, आता संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags: #GavakadachiBatmi #गावाकडचीबातमी #JitheGaavTitheAamhi #LocalNews

