गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय ; महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, व्यापाऱ्यांनाही फटका
Editor Milind Jamnik Gavakadachibatmi
मूर्तिजापूर - गॅस तुटवड्याच्या वाढत्या परिस्थितीमुळे केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे राशन कार्ड धारकांना रॉकेल वितरीत करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या वापरासाठी आवश्यक असलेले स्टोव्ह बाजारातून जवळपास गायब झाल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रॉकेल उपलब्ध होणे ही दिलासादायक बाब असली तरी त्याचा सुरक्षित वापर कसा करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी वापरात असलेले स्टोव्ह आता बाजारात मिळत नसल्याने नागरिकांना पर्याय म्हणून पुन्हा चुलीचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, घरात रॉकेल साठवून ठेवल्याने अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळीतकांडाच्या घटना वाढण्याचा धोका असल्याचीही भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय तात्पुरता दिलासा देणारा असला, तरी त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
गॅस मिळत नाही म्हणून चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. पण धुरामुळे डोळे जळतात श्वास घेणं अवघड होतं. आधी सरकारने गॅस दिला, आता पुन्हा मागे का नेत आहेत.रॉकेल देतील पण स्टोव्ह नाही. मग आम्ही काय करायचं.
शिल्पा जामनिक, महिला नागरिक
रॉकेल देणं चांगलं आहे, पण त्याचा वापर करण्याची साधनं नसतील तर हा निर्णय अर्धवट ठरतो तसेच अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार.
पुरुषोत्तम चिंचे, नागरिक, सांजापूर
-------------------------------------------
पुर्वी स्टोव्हची मोठी मागणी होती पण गॅस आल्यावर ती पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे आता बाजारात स्टोव्ह मिळत नाहीत. अचानक मागणी वाढली तर पुरवठा करणे कठीण आहे.
प्रमोद गिते, भांडे व्यवसायीक
-------------------------------------------
* प्रश्न अनुत्तरितचं *
पूर्वी चुलीवर स्वयंपाक करणे महिलांच्या आरोग्यास व पर्यावरणाला घातक असल्याचे सांगत गॅस योजना राबविण्यात आली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत पुन्हा चुलींचा वापर वाढत असल्याने त्या धोक्यांकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
