जागेच्या वादातून धमक्या; विष प्राशनाची घटना, बेलदरीत खळबळ

 




पैशांची मागणी व जीवे मारण्याची धमकी; उपचारासाठी उमरखेडहून नांदेडला हलवले



श्रीकांत राऊत यवतमाळ, जिल्हा प्रतिनिधी 

महागाव तालुक्यातील बेलदरी येथे जागेच्या जुन्या वादातून निर्माण झालेल्या तणावातून एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलदरी येथील विजय पवार यांच्या ताब्यात गेल्या सुमारे वीस वर्षांपासून संबंधित जागा असल्याचे सांगितले जाते. मात्र जीवनराव गुलाब आडे यांनी ती जागा स्वतःची असल्याचा दावा करत वाद निर्माण केला. त्यांनी विजय पवार यांच्या घरी जाऊन “ही जागा माझी आहे, पैसे दिले नाहीत तर तुला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच घर खाली केले नाही तर JCB फिरवण्याची धमकीही देण्यात आल्याचे सांगितले जाते.

या प्रकारामुळे विजय पवार मानसिक तणावाखाली आले असल्याची चर्चा असून त्यातूनच त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना उमरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे प्रकृती गंभीर असल्याने आवश्यक उपचार शक्य नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.


सध्या त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना


देण्यात आली असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

जागेच्या वादातून अशा प्रकारे धमक्या देणे व त्यातून गंभीर परिणाम घडणे ही चिंतेची बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी व पीडित व्यक्तीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

एकूणच, बेलदरी येथील या घटनेमुळे पुन्हा एकदा जागेच्या वादाचे गंभीर परिणाम समोर आले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post