" प्रेयसीने रचलेला अजब कट "
महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता बलात्काराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले.
सोलापूर : सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडवून देणाऱ्या सामूहिक बलात्काराप्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. स्वतःच्या प्रियकराला जुन्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी आणि साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी एका महिलेने रचलेला हा 'बलात्काराचा बनाव' पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाला आहे..
Solapur
•डायल 112 वर कॉल करून सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार•
18 मार्च 2026 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय तरुणीने 112 या नंबरवर फोन करून आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हालचाली केल्या. तरुणीच्या फिर्यादीवरून चार संशयित तरुणांना ताब्यात घेतलं.18 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सामूहिक बलात्कार झाल्याची नोंद झाल्या बरोबर सर्वच पोलीस अधिकारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल होऊन तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांना या घटनेत अनेक विसंगती आढळून येत होत्या.
पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स (CDR) आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच महिलेच्या मैत्रिणी आणि बहिणीची चौकशी केली असता बलात्काराची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर पोलिसी खाक्या दाखवताच महिलेने हा सर्व प्रकार बनाव असल्याची कबुली दिली.
प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीची खोटी तक्रार
संबंधित तरुणीच्या प्रियकरावर एका प्रकरणात 22 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता.अनेक दिवस प्रियकर न्यायालयीन कोठडीत होता. 18 सप्टेंबर 2025 रोजी त्याला उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. प्रियकराला 1 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधून जामीन मिळाला होता मात्र, प्रियकर विरोधात संबंधित फिर्यादीने सर्वोच्च न्यायालयात अपील करून त्याचा जामीन केला होता.या जुन्या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी या प्रियकर-प्रेयसीने सामूहिक बलात्काराची खोटी कथा रचली. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.
प्रियकर आणि प्रेयसीला अटक
विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.भारतीय न्याय संहितेच्या कलम 248, 217 व 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

