विदर्भाचा कोहिनूर पडद्याआड ज्येष्ठ नेते आणि मा. खा. दत्ता मेघे (वय -७९) यांचे निधन… विदर्भातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं पर्व काळाच्या पडद्याआड गेलं. भावपूर्ण श्रद्धांजली…
Nagpur, Maharashtra
विदर्भ,नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. दत्ता मेघे तब्बल चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. नागपूर, रामटेक, वर्धा या मतदारसंघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी मंत्री दत्ता मेघे यांचा जन्म हा विदर्भात वर्धा येथे 11 नोव्हेंबर 1936 रोजी झाला होता. त्यांनी राज्यसभा आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.
नागर युवक शिक्षण संस्था'च्या माध्यमातून तसेच 'दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स' या महत्त्वाच्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विदर्भातील ग्रामीण भागात शिक्षण सुविधा देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचे सुपुत्र हेही राजकारणात सक्रिय असून समीर मेघे हे विद्यमान आमदार आहेत. माजी मंत्री दत्ता मेघे यांच्या निधनाचे वृत्त कळताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे.
दत्ता मेघे यांच्या निधननंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
दत्ताभाऊ प्रदीर्घ काळ राजकारणात होते. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री अशी अनेक सन्माननीय पदे भूषविली. राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून गरीब, सामान्य माणसाचे कल्याण केले पाहिजे, हे संस्कार त्यांनी आम्हा सर्वांना दिले. शाळा तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांनी असंख्य गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण दिले. गरीब मुला-मुलींचे लग्न लावून दिले. गरिबांचे संसार उभारले", अशी आठवण चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोस्टमध्ये सांगितली.
दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. त्यांच्या दारात आलेला प्रत्येक दुःखी माणूस आनंद घेऊनच परत गेला. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आयुष्यभर गरिबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळेच त्यांना सर्वजण श्रद्धेने "दत्ताभाऊ" म्हणायचे. दातृत्व आणि करूणेचे मूर्तिमंत रूप असलेल्या दत्ताभाऊंच्या निधनाने मी माझा कुटुंबप्रमुख गमावला आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या व कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. अशा भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या...
