नगर परिषदेची धडक मोहीम ; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

 



 कचरा टाकणे, अतिक्रमण, अनधिकृत फ्लेक्स व प्लास्टिक वापराविरोधात विशेष पथकाची तपासणी



विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

मुर्तीजापूर : शहरात स्वच्छता राखणे, पर्यावरण संरक्षण करणे तसेच शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मुर्तीजापूर नगर परिषदेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगर परिषद दंडात्मक पथकाने शहरातील विविध भागात पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.

नगर परिषद हद्दीत काही नागरिक व व्यावसायिकांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, दुकानासमोर साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, अनधिकृत अतिक्रमण करणे तसेच परवानगीशिवाय फ्लेक्स व होर्डिंग लावणे यासारख्या प्रकारांची नोंद होत होती. तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक पिशव्या व साहित्याचा वापर आणि साठवणूक होत असल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, घनकचरा व्यवस्थापन नियम व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेकडून विशेष दंडात्मक पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, प्रमुख रस्ते तसेच गर्दीच्या भागात पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. कारवाईदरम्यान संबंधित नागरिक व व्यावसायिकांना भविष्यात नगर परिषद नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

शहरातील स्वच्छता व शिस्त अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अतिक्रमण करू नये तसेच नगर परिषद नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले आहे.

ही कारवाई मुख्याधिकारी निलेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत नगर अभियंता प्रसाद राठोड, संगणक अभियंता आशिष भगत, स्वच्छता निरीक्षक विजय लकडे, नरसिंग चावरे, शहर समन्वयक केतन चिंचमलातपुरे, लिपिक चित्रा हनुमंते, शारदा कानोसे तसेच शिपाई यश यावले यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post