" ऑपरेशन शोध " मोहिमेत यश ; भंडाऱ्यात आंतरजातीय तरुणासोबत आढळली, समुपदेशनानंतर पालकांच्या स्वाधीन
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी माना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे कुटुंबीयांसह गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माना पोलिसांनी " ऑपरेशन शोध " मोहीम राबवत अखेर महिनाभरानंतर संबंधित तरुणीचा शोध लावला.
माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालत तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस हवालदार दीपक सोळंके व पोलीस कॉन्स्टेबल सतीश आवडते यांच्या सहकार्याने तांत्रिक माहिती, स्थानिक माहितीदार आणि विविध ठिकाणांवरील संपर्कांच्या माध्यमातून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. संबंधित तरुण व तरुणी यांनी मोबाईल फोन बंद करून ठेवले असल्यामुळे त्यांचा ठावठिकाणा शोधणे अधिक कठीण झाले होते. तरीदेखील पोलिसांनी सातत्याने शोधमोहीम सुरू ठेवत सातारा, नागपूर आणि भंडारा येथे तपासाची दिशा वाढवली. अखेर तपासादरम्यान तरुणी भंडारा येथे एका आंतरजातीय तरुणासोबत राहत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर माना पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी संयमाने समुपदेशन करून तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. संबंधित युवकासही योग्य समज देण्यात आली. त्यामुळे कोणताही वाद न होता हे प्रकरण शांततेत मार्गी लागले.
माना पोलिसांनी संवेदनशीलता व संयम राखत केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून ठाणेदार गणेश नावकार व माना पोलीस स्टेशनच्या कार्याचे कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. तरुणी सुरक्षितपणे कुटुंबाकडे परतल्यामुळे कुटुंबीयांनीही पोलिसांचे आभार मानले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सदर कारवाईत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार, पो.हे.कॉ. दीपक सोळंके, पो.कॉ. सतीश आवडते यांनी केली.
