प्रेमप्रकरणाच्या तणावातून उंदीर मार औषध प्राशन ; ठाणेदार गणेश नावकार यांच्या तत्परतेने वेळेत उपचार
मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशनमध्ये एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली; मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. ही घटना १२ मार्च रोजी घडली असून पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यामुळे युवकाचा जीव धोक्यातून वाचला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोर्टा येथील संकेत भाऊराव वानखडे हा युवक कामानिमित्त बाहेरगावी गेला असताना त्याची चांदूर बाजार येथील एका विवाहित महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर मुलाच्या आई-वडिलांच्या संमतीने दोघांचे रीतीरिवाजाप्रमाणे लग्न लावून देण्यात आले.दरम्यान, संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. या संदर्भात १२ मार्च रोजी चांदूर बाजार पोलिसांनी मिसिंगचा अहवाल (क्रमांक १०/२०२६) माना पोलिसांकडे पाठविला.माना पोलिसांनी शोध घेऊन संबंधित महिलेला शोधून काढले. संकेत वानखडे स्वतः त्या महिलेला दुचाकीवर बसवून चौकशीसाठी माना पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. चौकशीदरम्यान घाबरलेल्या अवस्थेत त्याने बाहेर जाऊन उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले, असे पोलिसांनी सांगितले.
औषधाचा परिणाम होत असल्याची हालचाल त्याच्या आईच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली. यावेळी माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी तातडीने कारवाई करत युवकाला मर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे रेफर केले. त्यानंतर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून आता त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित महिलेला माना पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी चांदूर बाजार पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलाची आठवण येत असल्यामुळे ती नातेवाईकांसह आपल्या घरी परतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

