ब्रम्ही खुर्द येथे जलसप्ताहानिमित्त जलजागृती कार्यक्रम ; पाणी संवर्धनाचा संदेश
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : तालुक्यातील ब्रम्ही खुर्द येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत जलसप्ताहानिमित्त जलजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. रोहिणी जल व मृदा संधारण संस्था आणि विभागीय जलसाक्षरता केंद्र, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल जामनिक होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जलदूत प्रविण प्रशिक्षक समाधान इंगळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी केंद्रप्रमुख सुरेश मडावी आणि शुध्दोधन जामनिक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पाण्याचे संवर्धन, त्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध कृती आणि प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचा संदेश देण्यात आला.
प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबात आणि परिसरात पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन समाधान इंगळे यांनी केले. “पाणी वाचविणे ही केवळ गरज नसून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल दिंडोकार यांनी केले. सूत्रसंचालन मंगला रडके यांनी तर आभार प्रदर्शन सतीश सोळंके यांनी केले.जलजागृतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

