बडनेरा येथे चमत्कार प्रयोग कार्यशाळा व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

 

Badnera



"वैज्ञानिक दृष्टीकोन जपणे ही संविधानिक बाब असून तो वाढीस लागण्यासाठी महा. अनिसच्या कार्यात सहभागी व्हा!” – विजया घोडेस्वार


अमरावती,बडनेरा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) बडनेरा शहर शाखेच्या वतीने पंचशील बुद्ध विहार, पंचशील नगर, नवीवस्ती, बडनेरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “चमत्कार प्रयोग कार्यशाळा व सत्कार सोहळा” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाची जपणूक या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मा. विजयाताई घोडेस्वार होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा. अनिसचे राज्य प्रधान सचिव मा. गजेंद्र सुरकार उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. सुरकार यांनी अंधश्रद्धेच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकत चमत्कारांच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत प्रभावी जनजागृती केली. विविध तथाकथित चमत्कारांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा स्पष्ट करत त्यांनी नागरिकांनी विवेकबुद्धीचा वापर करून अंधश्रद्धेला बळी पडू नये, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. विजयाताई घोडेस्वार यांनी “वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणे व जपणे ही प्रत्येक नागरिकाची संविधानिक जबाबदारी आहे. समाजात वैज्ञानिक विचारसरणी रुजावी व वाढीस लागावी यासाठी महा. अनिसच्या कार्यात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा,” असे ठाम प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला विजय डवरे (जिल्हा प्रधानसचिव, अमरावती), नरेंद्र धर्माळे (कार्यवाह, वैज्ञानिक जाणीवा प्रशिक्षण विभाग), रेहमत शहा (शाखा अध्यक्ष महा. अनिस बडनेरा), दिलीप लाडे (शहर शाखा कार्याध्यक्ष, बडनेरा), नूतन वासनिक (शहर कार्यवाह, आंतरजातीय विवाह विभाग), वि. दा. पवार (सामाजिक कार्यकर्ते), राजीव बसवनाथे (आधार बेघर निवारा), भूमिका पहूरकर (शहर शाखा प्रधान सचिव), रवींद्र फुले (अमरावती शहर शाखा कार्याध्यक्ष), वर्षा गावंडे (अमरावती शहर शाखा प्रधानसचिव), संजय सरवटकर (मीडिया प्रतिनिधी), अविनाश गोंडाने (पत्रकार)आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ अधिक प्रभावी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व बेघरांसाठी कार्य करणाऱ्या ज्योती राठोड (आधार निवारा, बडनेरा), प्राणी व सर्पविज्ञान क्षेत्रात कार्यरत  मोनाली सदावर्ते (सर्पमित्र), आंतरजातीय विवाहातून जातमुक्तीच्या चळवळीत सहभागी झालेल्या मा. मोनाली राठोड व मा. सचिन राठोड, शैक्षणिक क्षेत्रातील मा. निर्मला मॅडम (होलीक्रॉस शाळा, बडनेरा), संविधान जागर व सामाजिक कार्यात सक्रिय अजय भालेराव तसेच विविध क्षेत्रात व क्रीडा क्षेत्रात कार्यरत संघरक्षक बडगे (मीडिया प्रतिनिधी) यांना शाल, संविधानाची प्रस्तावना व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप लाडे यांनी केले तर सूत्रसंचालन मनाली इंगळे (पहूरकर) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसीम फरहत, वंदना पवार, नंदा कांबळे, कुंदा मेश्राम, अनुपमा गोंडाने, रंजना भजगवरे, सरिता लाडे, रमा मोहोड, सुषमा शेटे, रेखा वाहने, किरण दुपारे, सीमा मडामे, छाया नारनवरे,हर्षा दातार, रेखा दातार, उमा इंगोले, वर्षा पकडे, उषा कोठार, शीतल वैद्य, दिपाली बांते, निर्मला किंदरले, रेखा शुक्ला, माला मेश्राम, ताराबाई गायकवाड, सुशीला भालेराव, पदमा बागडे, मंदा वानखडे, दुर्गा सूर्यवंशी, नंदा अडकणे, तुळसा पक्कीडे, शालू डोंगरे, प्रियका खडतडे, शुभम दमाहे, पवन दिहाडे तसेच महा. अनिस बडनेरा शाखेची संपूर्ण कार्यकारिणी, संविधान जागर अभियान अमरावती ची टीम, महिला बचत गटांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन नूतन वासनिक यांनी केले.

या कार्यक्रमामुळे बडनेरा परिसरात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत प्रभावी जनजागृती होऊन नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.


Tag : #Scientific_Approach #Constitutional_Duty #Science_Loyalty #Maha_Anis #Superstition_Free_Maharashtra #Vijaya_Horseback #Scientific_Awareness #Constitution_Dedication #Scientific_Thoughts #Scientific_Study #Science_and_Technology, #वैज्ञानिक_दृष्टिकोन #संवैधानिक_कर्तव्य #विज्ञाननिष्ठा #महा_अनिस #अंधश्रद्धा_मुक्त_महाराष्ट्र #विजया_घोडेस्वार #वैज्ञानिक_जागृती #संविधान_समर्पण #वैज्ञानिक_विचार #वैज्ञानिक_अभ्यास #विज्ञान_आणि_तंत्रज्ञान #भारताचे_संविधान #निसर्गाचा_आदर #वैज्ञानिक_दृष्टीकोन_वाढवा #वैज्ञानिक_विचार_प्रसार

Post a Comment

Previous Post Next Post