अमरावती,मोर्शी : विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्व. अण्णासाहेब कानफाडे स्मृती विद्यालय,मोर्शी येथे गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी यांच्या सहकार्याने पार पडला. उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रकाश मंगळे यांनी 14 ते 15 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांना गर्भाशय मुख कर्करोगाची कारणे, लक्षणे तसेच त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती दिली. योग्य वयात एचपीव्ही लस घेतल्यास गर्भाशय मुख कर्करोगासारखा गंभीर आजार टाळता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीपजी टिगंने तसेच कर्मचारी विनय शेलुरे, प्रशांत बेहरे, कल्पना पंधरे व सौ.पुष्पाताई पंधरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.पालकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. डी.जुनघरे होते.यावेळी पालक प्रतिनिधी नंदकिशोर वडुळकर, मनीषा संतोष मोहोड, पालकवृंद, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.व्ही.व्ही. करडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ए.एस.धांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
