📍 खामगाव (जि. बुलढाणा) :-
खामगाव पंचायत समितीतील गटविकास अधिकाऱ्याविरोधात गंभीर आरोप करत भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने तात्काळ चौकशी करून निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, संबंधित गटविकास अधिकारी गेल्या सात वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, राजकीय दबावाखाली निर्णय घेतले जात असल्यामुळे तालुक्यातील विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, खामगाव तालुक्याला मिळालेला विकास निधी आणि १५ वा वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात खर्च न झाल्याने अनेक कामे प्रलंबित असल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित गटविकास अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा तालुका खामगाव येथील पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदनावर भाई महेंद्र खंडारे (भूमी मुक्ती मोर्चा तालुका कार्याध्यक्ष तथा बहुजन मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष खामगाव),गौतम जाधव (तालुका उपाध्यक्ष), प्रमोद इंगळे(तालुका सचिव), आनंदा मोरे (तालुका सचिव),विजय इंगळे (तालुका संघटक), गोपाल ठाकरे (सहसचिव) व अन्य पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. मागणी ही रास्त असून संपूर्ण तालुक्याचे यावर लक्ष वेधून आहे. मागणी पूर्ण न झाल्यास बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

