प्रकरण खरातचे; पण आरसा समाजाचा!!

गावाकडची बातमी


 

    प्रकरण खरातचे; पण आरसा समाजाचा!!    


नाशिकमधील तथाकथित भोंदू अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या प्रकरणातील सर्वांत भयावह बाब म्हणजे अनेक महिलांवर झालेला छळ, फसवणूक आणि लैंगिक शोषण. त्यामुळेच या प्रकरणाला मोठे बातमीमूल्य प्राप्त झाले आहे. मात्र या प्रकरणाची समाजमाध्यमांवरील चर्चा पाहिली असता आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात.

या प्रकरणात पीडित महिलांची मानसिक अवस्था काय असेल, त्यांच्या मनात किती भीती, अपराधगंड, असुरक्षितता आणि वेदना असतील यावर गंभीर चर्चा व्हायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात तशी संवेदनशीलता दिसून येत नाही. उलट काही व्हिडिओ आणि फोटो अधिक स्पष्ट करून, कोणताही विचार न करता मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात आहेत. चेहेरे ओळखू येतील अशा पद्धतीने ते प्रसारित केले जात आहेत आणि त्यावर टवाळ, अश्लील व अत्यंत असंवेदनशील टिप्पण्या केल्या जात आहेत.

हे पाहताना मन सुन्न होते. कारण हा विषय मनोरंजनाचा नाही; हा अत्यंत गंभीर सामाजिक चिंतनाचा विषय आहे. मात्र समाजातील एका मोठ्या घटकाने त्याला केवळ चघळण्याचा विषय बनवलेले दिसते.

थोडा वेळ थांबून आपण एक गोष्ट कल्पना करून पाहूया. समजा या प्रकरणातील एखादी स्त्री पीडित असेल; परंतु स्वतःची अब्रू आणि कुटुंबाचा सन्मान जपण्यासाठी तिने अजून पुढे येण्याचे धाडस केले नसेल. तिच्या मनात या क्षणी किती भयंकर वादळ सुरू असेल याची आपण कल्पना करू शकतो का?

कदाचित तिच्या कुटुंबीयांना एवढे तरी माहिती असेल की ती कधीतरी त्या व्यक्तीकडे गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनातही संशयाची सावली असू शकते – तिलाही काही भयंकर अनुभवाला सामोरे जावे लागले असेल का? तिच्यावरही अत्याचार झाला असेल का? घरातील लोकांना कदाचित थेट विचारण्याची हिंमत होत नसेल; पण त्यांच्या मनातही प्रचंड गोंधळ आणि अस्वस्थता निर्माण झाली असेल.

आणि त्या स्त्रीच्या मनात तर आणखी वेगळाच मानसिक ताण सुरू असू शकतो. या प्रकरणात अनेक व्हिडिओ सापडल्याची चर्चा सुरू आहे. तिच्या मनात कदाचित एक भीती सतत डोकावत असेल – त्या व्हिडिओंपैकी एखाद्यात तिचाही व्हिडिओ असेल का? तो पोलिसांच्या हाती लागला असेल का? उद्या तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला तर? त्या क्षणी तिच्या सन्मानाचे काय होईल?

अशा असंख्य प्रश्नांच्या ओझ्याखाली एखादी स्त्री किती भयानक मानसिक ताण सहन करत असेल याची आपण कल्पना तरी करतो का? पण याच वेळी समाजमाध्यमांवर या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ अधिक स्पष्ट करून शेअर केले जात आहेत आणि त्यावर टवाळखोर टिप्पण्या केल्या जात आहेत. जणू काही हा एखादा मनोरंजनाचा विषय आहे. ही विसंगतीच अत्यंत अस्वस्थ करणारी आहे.

क्षणभर आपण स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा – जर या महिलांपैकी एखादी आपली आई, बहीण किंवा मुलगी असती, तर आपण अशीच वागणूक दिली असती का? तिचे फोटो-व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकून त्यावर टिप्पणी करत बसलो असतो का? कदाचित नाही. मग इतर कोणाच्या आई-बहिणीबद्दल आपण इतके कठोर आणि असंवेदनशील कसे होतो?

या प्रकरणातील एक महत्त्वाची गोष्ट समाजाने समजून घेतली पाहिजे – या महिला दोषी नाहीत; त्या पीडित आहेत. त्या फसवलेल्या आहेत, दिशाभूल झालेल्या आहेत, काही वेळा ब्लॅकमेल केलेल्या आहेत आणि काही वेळा दहशतीखाली ठेवलेल्या आहेत. अशा तथाकथित बुवांकडून अनेकदा भावनिक, मानसिक आणि कधी कधी शारीरिक दबाव टाकून स्त्रियांना वश केले जाते. परंतु समाज त्यांच्या वेदना समजून घेण्याऐवजी त्यांच्या चारित्र्यावरच संशयाची सावली टाकतो.

यामागे एक मोठे कारण आहे – आपल्या समाजात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान मानसिकता. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून न पाहता तिच्याकडे संशयाने किंवा नियंत्रणाच्या दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. त्यामुळे एखाद्या घटनेत स्त्री पीडित असली तरी समाजाचा पहिला प्रश्न तिच्यावरच उभा राहतो – “ती तिथे गेलीच का?”, “तिने विश्वास का ठेवला?”

ही मानसिकता बदलल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. कारण सत्य हे आहे की अशा घटनांमध्ये केवळ एखादा व्यक्ती दोषी नसतो; समाजाच्या मानसिकतेचाही त्यात काही अंश असतो. ज्या समाजात स्त्रियांना दोष देण्याची सवय आहे, जिथे त्यांच्या वेदनांपेक्षा त्यांच्या “चुका” शोधल्या जातात, जिथे त्यांच्या सन्मानापेक्षा त्यांच्या बदनामीची भीती मोठी असते – त्या समाजात पीडित स्त्रिया पुढे येण्यास घाबरतात. आणि त्या भीतीतूनच अशा विकृत लोकांचे धाडस वाढते.

म्हणूनच या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे पुरेसे नाही. हा प्रसंग समाजाला स्वतःकडे पाहण्याची संधी देणारा आहे. आपल्या संवेदनशीलतेचा, आपल्या स्त्रीदृष्टीचा आणि आपल्या सामाजिक जबाबदारीचा हा एक आरसाच आहे.

आज सर्वांत मोठी गरज आहे ती संवेदनशीलतेची. पीडितांकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणेने पाहण्याची. त्यांच्या वेदना समजून घेण्याची. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रीच्या सन्मानाला आपल्या समाजजीवनाचा केंद्रबिंदू मानण्याची.

कारण शेवटी प्रश्न फक्त एका प्रकरणाचा नाही; प्रश्न आहे आपण कसा समाज घडवतो आहोत याचा.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

प्रफुल्ल मंदा श्रीधर,जिल्हा कार्याध्यक्ष

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती

मो. ९६६५१८५४२८

Post a Comment

Previous Post Next Post