परतवाड्यात पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी; तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद कमी,* कायदा-सुव्यवस्था राखण्याची गरज
उपसंपादक/संतोष भालेराव
Achalpur ,परतवाडा : तालुक्यात इंधन टंचाईबाबत पसरलेल्या अफवांमुळे परतवाडा शहरासह परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. तहसीलदार कार्यालयाकडून इंधनाचा पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट आवाहन करण्यात आले असतानाही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या.
तहसीलदार यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आवाहनात सध्याच्या परिस्थितीत इंधनाचा कोणताही तुटवडा नसून पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असेही आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोशल मीडियावर पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी इंधन साठवण्यासाठी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली.
या अनपेक्षित गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी काही ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.
प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, इंधन पुरवठा नियमित सुरू असून कोणतीही टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे व अफवांपासून दूर राहावे. तसेच, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काही जागरूक नागरिकांनीही शांतता व संयम राखण्याचे आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
