राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देवरा येथे चमत्कार प्रात्यक्षिकातून अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन

 




देवरा, दि. ३ मार्च २०२५ : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून देवरा येथे चमत्कार प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दुपारी ११.३० ते २.०० या वेळेत आयोजित या कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. रंगपंचमीचा दिवस असूनही कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती राहून तो यशस्वी ठरला.

सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्रमोद कोळमकर (जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय डवरे (जिल्हा प्रधानसचिव, महा. अनिस अमरावती) होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अनिस अमरावती),  बाबुराव उभाड (अध्यक्ष, महा. अनिस देवरा शाखा) तसेच मा. सचिन खोब्रागडे (विविध उपक्रम कार्यवाह, अमरावती शहर शाखा) उपस्थित होते.

कार्यक्रमात विविध तथाकथित ‘चमत्कारां’मागील वैज्ञानिक तत्त्वे प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे उलगडून दाखविण्यात आली. अंधश्रद्धा कशी पसरते, तिचा समाजजीवनावर कसा विपरीत परिणाम होतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन का आवश्यक आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी विवेकनिष्ठ विचार स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले.

तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने रंगपंचमी दिनी हा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ देवरा व महा. अनिस शाखा देवरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गजानन देशमुख, संजय देशमुख, मोहन तायलकर, पुंडलिकराव देशमुख, शैलाताई देशमुख, वंदना देशमुख, आभाराव तेलखडे, महेंद्र देशमुख, वृषभ देशमुख आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचालन सौरभ देशमुख (कार्याध्यक्ष, महा. अनिस शाखा देवरा) यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मंगेश देशमुख यांनी मानले. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाने वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसाराला बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post