क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 




अमरावती, दि. —०३-मार्च-२०२५ ला. अमरावती येथील महात्मा फुले नगर, नवसारी परिसरात “संघर्षातून क्रांती, क्रांतीतून नवनिर्मिती” या प्रेरणादायी थीमअंतर्गत जबाबदार नागरिकत्व व विकास या ध्येयाने कार्य करणाऱ्या क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम संघर्ष महात्मा फुले नगर येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मो. अफसर भाई होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून क्रांती राष्ट्रीय सल्लागार समितीचे प्रफुल्ल ठाकरे, संदीप यादव, विजय डवरे, भाई प्रफुल्ल, गणेश गहुकार उपस्थित होते. तसेच दिक्षा गहुकार, विजया करोले, वैशाली वाघ, सरिता विघे, शुभम दमाहे, आशिष देशमुख, जय करोले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून तसेच संविधान प्रास्ताविका, ग्रामगीता व संतविचार पुस्तिकांना अभिवादन करून करण्यात आली. मेणबत्ती प्रज्वलनानंतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. संघटनेचा वर्धापन दिन दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी साजरा करण्याची परंपरा जपली जाते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या गेल्या १२ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला. मूल्यसंवर्धन, पथनाट्य, युवा संघटन बांधणी, स्त्री सन्मान व स्त्री संरक्षण उपक्रम, विविध पुरस्कार वितरण तसेच कोरोना काळात देशातील २१ जिल्ह्यांत केलेल्या सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कार्यकारिणीत होणारे बदल, कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्याचा निर्णय तसेच चालू वर्षभर व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा ठराव यावेळी जाहीर करण्यात आला. येत्या तीन महिन्यांत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार भाई प्रफुल्ल यांनी केले. संचालन राष्ट्रीय समन्वयक दिलीप लाडे यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय उपाध्यक्ष दिगंबर मेश्राम यांनी केले. शेवटी क्रांती गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी सर्व उपस्थितांना होळी व रंगपंचमी तसेच वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post